कोल्हापूरवासियांवरून पुराचे सावट काही कमी होताना दिसत नाही. या पूर  परिस्थितीने जनजीवन विस्कळीत केलंच आहे. सोबतच आता पेट्रोल आणि डिझेलचा  तुटवडाही जाणवत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुणे-बंगळुरू महामार्गावरील  वाहतूक बंद पडल्याने बुधवारी शहरातील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल, डिझेल  संपले. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या शोधात वाहनधारकांची वणवण सुरू आहे.  दुसरीकडे शहरातील पूरस्थिती कायम असल्याने मदतकार्याला वेग आलेला दिसत आहे.

पेट्रोल पंपांचे व्यवस्थापन कोलमडले

सांगली जिल्ह्यातील भिलवडी व हजारवाडी येथून कोल्हापूरला पेट्रोल, डिझेल  पुरवले जाते. मात्र पावसामुळे कोल्हापूरला येण्याचे काही मार्ग बंद झाले.  त्यामुळे पेट्रोल, डिझेल न मिळण्याच्या भीतीने ग्राहकांनी मंगळवारीच  पंपांवर मोठी गर्दी केली होती. राजारामपुरी, कावळा नाका, उमा टॉकीज,  उद्यमनगर, फुलेवाडी, देवकर पाणंद, पुईखडी रोड येथील पंपांवर मोठी गर्दी  दिसली. ग्राहकांनी सकाळपासूनच मोठी रांग लावल्याने दुपारपर्यंत पेट्रोल  संपले होते. ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे पेट्रोलपंपांचे  व्यवस्थापन कोलमडले. पुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने  मदतपथकासाठी उर्वरित पेट्रोल पंप ताब्यात घेतले आहेत.

कोल्हापुरात मदतकार्याला वेग

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने कोल्हापूरवासियांची दैना उडाली आहे.  बुधवारी पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, ती १३ फूट अधिक  उंचावरून वाहत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचे हाल अद्याप कायम आहेत. याची  दखल घेत एनडीआरएफ, नौदल, लष्कर यांच्यासह स्थानिक तरुणांच्या माध्यमातून  मदतकार्याला आणखी वेग आला आहे. आतापर्यंत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून  तब्बल ५५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. ५५ बोटी  सध्या जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम करीत आहेत.

कोल्हापूरातील स्थितीची थोडक्यात माहिती :

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूरस्थितीचा आढावा घेतला

- कसबा बावड्यातील भगवा चौक ते छावा चौक मार्गावरील पाणी ओसरले. वाहतूक पूर्ववत

- नागला पार्क परिसरातील विन्स रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णांना सुरक्षितस्थळी हवलण्यात आले

- भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी कोल्हापूरला लागेल ती मदत पोहोचवण्याची तयारी दर्शवली आहे.